

गेल्या पंचवीस-तीस वर्षांच्या काळात शेतीव्यवसायात टप्प्याटप्प्याने यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढत गेला. जागतिकीकरणाने गाव-खेड्यांत नवी आव्हाने निर्माण झाली. त्याचा बदलत्या समाजव्यवस्थेवर बरा-वाईट परिणाम झाला. आत्मीयता आणि विश्वास यांची जागा लूटमार आणि द्वेषभावनेने घेतली. शेतीचाही अन्य मार्गाने वापर करण्याचा विचार होऊ लागला. अशा खळबळजनक सामाजिक अवस्थांतरात एखादे कुटुंब शेती हाच व्यवसाय असूनही सुखी असते, तर काहींना शेती विकायला काढावी लागते. ही परिस्थिती पार्श्वभूमीला ठेवून या व्यवसायातली सकारात्मक बाब वाचकांच्या मनात पेरली जावी या भूमिकेतून सदानंद देशमुखांनी कलात्मक पातळीवर ‘चारीमेरा’ या कादंबरीची निर्मिती केली आहे.
चारीमेरा म्हणजे शेताच्या चारही बाजू. शेताच्या सीमा निश्चित करण्याशी संबंधित असलेला हा अस्सल वैदर्भीय शब्द आहे. वेळच्या वेळी बांधबंदिस्ती करून चारीमेरा मजबूत ठेवाव्या लागतात; नाही तर शेताचा खंगळा झाल्याशिवाय राहत नाही. तोच नियम शेती कसणाऱ्याच्या मनालाही लागू पडतो. ही बाब उदेभान आणि भावनाताई या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून या कादंबरीत ठळकपणे अधोरेखित होताना दिसते.